Parking @ your own Risk!!!

“पुणे तिथे काय उणे!!”,आता हे झाले खुप जुने!!माझं म्हणणं कट्टर पुणेकरांना,साहजिकच पटणार नाही.अशा पुणेकरांना मी एक खास “ओपन च्यालेंज” देऊ इच्छिते.ह्या लोकांनी मला,पाहिजे त्या वेळी,हवं त्या ठिकाणी,कुठल्याही दिवशी आणि अख्ख्या पुण्यात कुठेही पार्किंगला जागा मिळेलच याची हमी द्यावी.नाही देणार मला माहिती!!साक्षात्‌ देव पण याची हमी देऊ शकणार नाही.अनुभवाचे बोल आहेत हे,असंच नाही म्हणत मी!!

आम्ही नवरा बायको एकदा सिनेमा पाहायला गेलो.कुठे म्हणून काय विचारता?अर्थातच,मल्टीप्लेक्स मध्ये!!कधी?साहजिकच,विकेंडला!!आम्ही आय.टी.त असतो ना कामाला!सोमवार ते शुक्रवार ची गुलामगिरी संपवून शनिवार-रविवारचं स्वातंत्र्य उपभोगायला अशा महागड्या ठिकाणीच सिनेमा पहायचा असतो,मॉल मध्येच शॉपिंग करायची असते.त्याशिवाय काय आम्हाला कुणी ऐटीतलं म्हणणार आहे,म्हणजे ,आय.टीतलं म्हणणार आहे?

तशी आमच्याकडे दुचाकी,चारचाकी,सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत.(त्याचेच हप्ते भरायला नोकरी करतो ,ही झाली झाकली मूठ…….!!)सिनेमा होता सकाळी ११.३०चा.सकाळी सकाळी कुणी पिक्चर पहायला जातं का?हो!!आम्ही जातो…तोच पिक्चर दुपारी किंवा संध्याकाळी दुप्पट ,तिप्पट पैसे देऊन बघण्यापेक्षा आम्ही तो सकाळीच पाहतो,अगदी १०० रुपयात वगैरे!!(पिक्चर तोच,तेच पात्र,तीच गाणी,मग कम दाम में मिले तो कोई मेहेंगा टिकट क्यूं ले?!सस्तावाला न ले??मान गये!!!)

आम्ही १० वाजता घरातून निघालो.गाडीत पेट्रोल भरणे,ए.टी.एम मधून पैसे काढणे,आणि सगळ्यात महत्वाचं,पार्किंग साठी जागा मिळणे या सगळ्या गोष्टींसाठी लवकर निघावं लागतं!आणि एकदा का तुम्ही तिथे पोचलात,तिथे तुमची गाडी,तुमची पर्स,तुम्ही, सगळं काही चेक होणार.पिक्चरची वेळ होईपर्यंत हे सगळे सोपस्कार व्हायला हवेत ना.तिकीट कधी काढणार म्हणून विचारताय?ऑंफिसमध्ये आम्ही काही नुसते ऑंफिसचंच काम करत नाही.लाईट बिल भरणे,फोन बिल भरणे,ऑनलाईन बँकिंग अशी बरीच कामं पण करत असतो.त्यातंच ऑनलाईन तिकीट काढण्याचा पण स्मार्टनेस आहे आमच्यात!!

अशा रीतीने आम्ही १० वाजता निघालो तर खरे,पण नशिबात वेळेवर पोचणं नव्हतं त्यादिवशी!!रस्त्यात पूर्ण ट्राफीक जाम.त्यातून कसेबसे बाहेर पडलो.१०.३०!!पेट्रोल पंपावर ही मोठी रांग!!११.००!!एकही ए.टी.एम चालू नको,कारण काय?तर म्हणे सगळे सर्व्हर डाऊन आहेत.११.१०!!थियेटर वर पोचलो तर तिथे पण पार्किंगसाठी लांबच्या लांब रांग.आमचा नंबर आला तेव्हा तिथल्या त्या सेक्युरिटी गार्डने “पार्किंग फुल्ल” ची पाटी आमच्या तोंडात मारल्यासारखी आपटली.११.२५!!

आता काय करायचं?त्यानीच आम्हाला खुणावलं,पलीकडच्या मॉल मध्ये पार्क करा म्हणून.तिथे गेलो तर तीच गत!!तिथला बाबा म्हणाला रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला एक मोकळं मैदान आहे,तिथे पार्किंगसाठी जागा नक्की मिळेल.परत गाडी फिरवली.मेन रोडला आलो.पलीकडे जायचं म्हणजे साहजिकच यु टर्न मारल्याशिवाय पर्याय नाही.टर्न वर सिग्नल,जो लाल झाला होता.इमेर्जेन्सी मध्ये सिग्नल तोडणे हा गुन्हा नाही हा आमचा,पुणेकरांचा स्वलिखित नियम आहे.पण त्या पल्याड आमचे ट्राफिक हवालदार मामा वाटच बघत होते एखादा शिकार सापडतोय का याची ?सिग्नल पडला,आम्ही यु टर्न मारला,एकदाचे त्या मैदानात पोचलो.

आत गेल्याबरोबर एका दादाने जोरात शिट्टी वाजवली.हातात पावती पुस्तक घेऊन तो धावत आमच्याकडे आला.”२० रुपये सुट्टे द्या”.इति दादा.(आमच्या पुण्यात १००,५००,१००० च्या नोटेची मिजाज दाखवायचं काम नाही हं!!त्याला इथे कवडीमोल किंमत आहे,चुकून एखाद्या दुकानात तुम्ही १० रु. ची साबणाची वडी,बिडी घ्याल आणि १०० ची नोट काढाल,दुकानदार तुम्हाला निर्विकार चेहऱ्याने “सुट्टे काढा” म्हणेल,तुम्ही म्हणाल ,”नाहीयेत हो.”तो तितक्याच निर्विकारपणे ती वडी किंवा जे काही तुम्ही खरेदी करू पाहत असलेलं सामान असेल ते उचलून परत कप्प्यात ठेवेल आणि..पुढे समजून घ्या,जे काही समजून घ्यायचं ते!!जो २ रुपयांपासून ते १०,२०,३० रुपयांपर्यंत सुट्टे पैसे बाळगून असतो तो सगळ्यात श्रीमंत मानला जातो.तो अतिशय गर्वाने,ताठ मानेने वावरतो.असो .किती गुण वर्णावे आमच्या पुण्याचे!!!!)त्याच्या हातात ते सुट्टे टिकवले.त्याच्या आदेशानुसार,सांगितलेल्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि आम्ही धावत सुटलो.वेळ:१२.०० !!पिक्चर सुरु होऊन अर्धा तास उलटला होता.रस्ता क्रॉस करून,धापा टाकत एन्ट्रन्सला पोहोचलो.तिथे सिक्युरिटी चेकिंगचे सोपस्कार पार पडले.पिक्चर मल्टीप्लेक्सला ना!!म्हणजे ४ स्क्रीन्स,त्यातली आमची एक!ती शोधून काढली,१२.१०!!पुढचं दिव्य,सीट नंबर शोधणे.ती पण अशा ठिकाणी होती कि किमान १० ते १२ लोकांना ठेचकाळत,त्या १०-१२ आणि मागचे जवळपास ५-५० लोकांच्या शिव्याशाप घेत पुढे जावं लागणार होतं.ते सगळं पचवून आम्ही अगदी विजयीमुद्रेत स्थानापन्न जहालो!!अशी पाठ टेकवून बसणार तेवढ्यात खाड्कन प्रकाश झाला आणि स्क्रीन वर मोठ्या,स्पष्ट,ठळक अक्षरात आलं,”INTERVAL”!!

विजायीमुद्रेतून आमचे चेहरे प्रश्नचिन्हांनी भरले.असं कसं शक्य आहे?११.३० वाजता तर चालू झालाय सिनेमा!लगेच कसाकाय इंटरव्हल होऊ शकतो?याला काय अर्थ आहे?वगैरे वगैरे.मग जरा हिंमत करून शेजारी विचारायचं ठरवलं.तेव्हा असं समजलं कि पिक्चर फक्त दीड तासांचाच आहे.एकंदरीत काय,तर आमचा अर्धा-निम्मा पिक्चर पार्किंगच्या शोधातंच गेला होता.विजायीमुद्रेतून प्रश्नचिन्ह,प्रश्नचीन्हातून कन्व्हर्ट होऊन आमचे चेहरे पार पडले होते आणि पडून जमिनीला टेकायचे बाकी होते.उर्वरित भाग चालू झाला.आता पुढचं काय समजणार होतं,काय चाललंय ते!!आम्ही वेड्यासारखे “THE END” कधी होतो ह्याची वाट पाहत होतो.खोटं सांगत नाही,ते उरलेले ४५ मिनिटं,४५ तासांसारखे वाटत होते.एकदाचा पिक्चर संपला.

आमचे पडलेले चेहरे उचलून आम्ही बाहेर आलो.म्हणलं,जाऊ दे,जे झालं ते झालं,आता कुठेतरी हॉटेलात जावं जेवायला.पण पार्किंग असलेल्या ठिकाणीच जायचं असं आमचं संगनमताने ठरलं.तिथेही वेटिंग असणार हे गृहित धरून होतो(.इथे शनिवार रविवार हॉटेलातली वेटिंगची रांग बघून तुम्हाला शंका येईल कि सगळ्यांचे घरचे सिलिंडर एकदाच कसे काय संपले??पण तसं काही नाही,हा पण आमच्या आय.टी कल्चरचाच एक भाग आहे.रोज घरचं खाऊन कंटाळा येतो ना!मग चेंज नको का जरा!)

पार्किंग जिथे केली होती त्या मैदानात गेलो.मी बाहेरंच उभी राहिले.नवरा गेला मधे गाडी आणायला.बराच वेळ झाला तरी हा बाहेर का येत नाही म्हणून मी त्याला शोधत आत गेले.तो इकडे तिकडे पळत होता,एक एक गाडी निरखून बघत होता,पुढे,मागे करत होता.मी त्याला विचारलं,”अरे,काय झालं?आणि तू एवढ्या मध्येपर्यंत का आलास?आपली गाडी तर अलीकडेच लावली आहे ना?

“नाही गं,तिथे नाहीये आपली गाडी.म्हणून तर शोधत शोधत आलोय इकडे.मला वाटलं दुसऱ्या गाड्यांना जागा करण्यासाठी त्या गार्ड ने हलवली असेल.पण कुठेच दिसत नाही.”

“तो बघ येतोय तिकडून.थांब,मी बोलावून आणते त्याला.”

“ओ दादा,जरा इकडे या ना एक मिनिट.”

“काय??काय झालं?”

“अहो.आम्ही इथे आमची स्कूटी लावली होती.ती इथे दिसत नाहीये.कुठे दुसरीकडे हलवली आहे का?”

“मी कशाला हलवू तुमची गाडी?नीट बगा ओ madam,तितंच असल.”

“नाही तिथे,म्हणून तर विचारतोय ना तुम्हाला!!”

“मला कशाला विचारता मग?माझा काय संबंध?”

“म्हणजे?काय संबंध म्हणजे काय?पैसे घेता ना पार्किंगचे?मग गाड्यांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी नाही का?”

“आमची जबाबदारी फक्त गाडी पार्क करेपर्यंतच असते ओ बाई!!किती गाड्या हायत इत,कुण्या कुण्या गाडीवर मनून लक्ष द्यायचं आमी!!आमचं काम फकस्त पावती फाडणे!!”

“पैसे कशाचे घेता मग?याला काही अर्थ नाही.थांबा,तुमची ग्राहक मंचातच तक्रार करते.प्रुफ म्हणून पावती आहे माझ्याकडे.”(अशा आणीबाणीच्या वेळी अस्सल पुणेकर न्यायाची कास धरून परिस्थितीला सामोरा जातो.)

“आहे ना?ती जरा नीट वाचा आणि मग जावा बिंदास कुट बी तक्रार करायला.”

“आहे ना पावती.थांब तू इथेच.तुलाच वाचून दाखवते व्यवस्थित अगदी,”

मी पावती हातात घेतली आणि एकदम त्यावरच्या मोठ्या अक्षरांवर माझी नजर पडली.तिथे लिहिलं होतं,

“PARKING AT YOUR OWN RISK!!!!!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *